मराठी ब्लॉग विश्व

Wednesday, March 16, 2011

किती दिवस...

किती दिवस धरून ठेवशील केसांमधे काळा रंग
किती दिवस लखाकेल तुझं गोरं गोरं अंग

किती दिवस डोळ्याखालची काळी वर्तुळं टळतील
किती दिवस गाली तुझ्या लाल फुलं फुलतील

किती दिवस राहील तुझ्या देहामधे दरवळ
किती दिवस खेचशील वासनांची वर्दळ

किती दिवस काळजाचा आवाज तुला येणार नाही
किती दिवस जीव तुझा आरशाला भिणार नाही

...वय तुझ्या अंगावर दाट जाळं विणेलच
मी खोटं बोलत नव्हतो हे तुला कळेलच....

- वैभव देशमुख

Tuesday, March 15, 2011

दिसे दिसायास

दिसे दिसायास वार साधा
नसे परी हा प्रकार साधा

अजून आहे घरंगळत मी
नको म्हणू हा उतार साधा

किती अशी कंजुषी असावी
दिला न मज तू नकार साधा

फसून जातो सहज कुठेही
खरेच मी फार फार साधा

तिथे बुडाले पुरात डोळे
इथे दिसेना तुषार साधा

धरा फिरवतात हात त्याचे
म्हणायला कामगार साधा

जगापुढे या असेल काही
तुझ्यापुढे मी सुमार साधा

कधी मला माग तू हवे जे
कळेल... नाही उदार साधा

किती निरागस दिवस जुने ते
सरळ रहाणी विचार साधा

बरेचदा श्वास टाळतो मी
नकोस समजू चुकार साधा

जिवास मी लावतो पणाला
मला न जमतो जुगार साधा

- वैभव देशमुख