मराठी ब्लॉग विश्व

Tuesday, November 7, 2017

ये जगा, थोडे अजुन ठोकर मला
तूच करशिल देवही नंतर मला

थेंब होता एक साधासाच तो
ज्यामधे दिसला महासागर मला

बोलले ते चेहरे सांभाळुनी
पण तरी दिसलाच वरचा थर मला

ही फुले रुततील पाठीला तुझ्या
या फुलांवरती गडे अंथर मला

आठवेना काय त्याने गायिले
पाठ त्याची जाहली खर्खर मला

मी मनी या माणसांच्या राहतो
तू कसा करशिल अता बेघर मला

आग ती अन मी असा मेणापरी
वितळलो... नव्हतेच गत्यंतर मला

जायचे असते मला कोठेतरी
घेवुनी येते इथे भाकर मला

तू नको घेऊ अता माझी दखल
नोंदते आहे उभे अंबर मला

- वैभव देशमुख