मराठी ब्लॉग विश्व

Sunday, September 19, 2010

उन्हाळी दुपार...

उन्हाळी दुपार सुस्तावले रान
मुके पानपान जाहलेले


आंब्याच्या पानात पाखरे गुडुप
मेंढ्यांचा कळप आंब्याखाली


बाभूळ झाडाची फाटकी सावली
तेथे विसावली गुरे काही


सुक्या नदिकाठी नग्न उभे साग
आकाशात आग लागलेली


कुणी एक बाई सरपन शोधात
लेकरु पोटात वाढताना...


- वैभव देशमुख

Wednesday, September 8, 2010

Friday, August 27, 2010

बंद दिवसाच्या घराचे दार...

बंद दिवसाच्या घराचे दार होताना
रोज आठवतो तुला अंधार होताना

सोबती होतीस माझ्या तू उन्हाळाभर
पण अता नाहीस हिरवेगार होताना

सोडले तू बाण आणिक चालती झाली
पाहिले नाही जिवाच्या पार होताना

सोसले होते कसे तू एवढे ओझे
कोलमडलो मी तुझा आधार होताना

आज खळखळले जरा ओठावरी हासू
पाहिले नाही असे मी फार होताना

- वैभव देशमुख

Monday, August 16, 2010

चार छोटुल्या


ठसे वाटेत बैलांच्या खुराचे
दिसे डबक्यातले पाणी चहाचे
उठे पाण्यावरी गोरे तरंग
कुणाचे घासले पाण्यास अंग

हवेचा येइ हिरवागार झोका
झुले त्याच्यासवे डोंगरही अख्खा
कसे हे साठवू सौंदर्य डोळी
बहरल्या डोंगरावर रानकेळी

धुक्याचा सारला परदा हवेने
उभे डोळ्यात हिरवेगार लेणे
कळेना काय डोळ्यांनी टिपावे
कळेना ओठ कोठे टेकवावे

निळा अंधार होता दाटलेला
पिकांचा वास ओल्याशा हवेला
कमी ना भासली कुठल्या दिव्याची
अशी झगमग बघितली काजव्यांची...

- वैभव देशमुख

Friday, July 16, 2010

पुढे सरू की जाऊ मागे...

पुढे सरू की जाऊ मागे काय करू...?
द्वीधा द्वीधा या हृदयाचे काय करू ?

इथेच झोपू की एखादे घर शोधू ?
वहीत आहे काही पत्ते काय करू ?

पुढच्या थांब्यावरती उतरुन जाशिल तू
तुझ्यासवे मी बोलुन खोटे काय करू ?

रद्दी सारी विकून आलो बाजारी
आता हे कवितांचे गठ्ठे काय करू ?

तुझी आठवण बिलगुन या ब्रम्हांडाला
तुझ्यासारखे दिसते सारे काय करू ?

सत्य दाटले पेनाच्या टोकावरती...
पुढ्यात आहे कागद कोरे काय

तिफन थांबवुन विचार करतो आहे मी
पेरू की खावू हे दाणे ? काय करू ?

- वैभव देशमुख

Tuesday, July 13, 2010

लेखणीचे पंख - गाणे

हे गाणे मी औरंगाबाद येथे झालेल्या स्त्री-कथी सम्मेलनासाठी लिहिले होते (सम्मेलन अध्यक्षा : कमल देसाई )
http://www.youtube.com/watch?v=oT-N_rsD0Sg

Friday, June 25, 2010

Thursday, June 24, 2010

गुणगुणावे मी तुला...


गुणगुणावे मी तुला अन तू मला
आठवावे मी तुला अन तू मला


शोध सौख्याचा निघालो घ्यावया
सापडावे मी तुला अन तू मला

चहरे बदलून हे गेले जरी
ओळखावे मी तुला अन तू मला

खेळ हा दोघासही जिंकायचा
हारवावे मी तुला अन तू मला

कोणते नाते असावे आपुले
का जपावे मी तुला अन तू मला ?

वादळे येतीलही जातीलही
सावरावे मी तुला अन तू मला........
- वैभव देशमुख

Wednesday, June 23, 2010

फुलांचा रस्ता.....

पायाशी आला होता धावून फुलांचा रस्ता
वेडात तुझ्या मी आलो टाळून फुलांचा रस्ता

बरसून तुझ्या अंगावर पाऊस सुगंधी झाला
अन गंध स्वताचा गेला विसरून फुलांचा रस्ता

या जन्मी ओळख नाही होणार तुझी काट्यांशी
तू भाळावरती आली गोंदून फुलांचा रस्ता

ते वेड तुझ्या प्रीतीचे ती ओढ तुझ्या भेटीची
आगीतुन चालत होतो समजून फुलांचा रस्ता

(चालाया तुझिया सोबत प्रेमाला वेळच नाही
तू काय मिळवले आहे मिळवून फुलांचा रस्ता)

हाताला देवुन हिसका ते दिवस पळाले मागे
अन पायाखालुन गेला निसटून फुलांचा रस्ता.....

ये जवळ....

ये जवळ तुजला जरा जवळून बघतो
आज स्पर्शाने तुला बोलून बघतो

प॑ख प्रीतीचे मिळाले एकदा की,
कोण या धरतीकडे पलतून बघतो

बा॑धता आले न मजला जे कधीही
त्या घराचे चित्र रेखाटून बघतो

लागता चाहूल ढळत्या यौवनाची
आरसा का एवढा त्रासून बघतो

का तुला मी घाबरावे सा॑ग मृत्यो
रे तुला मी जन्मल्यापासून बघतो........

Monday, March 22, 2010

झाडं असतात विद्यार्थी...




झाड॑ असतात विध्यार्थी रुतू त्या॑चे गुरू असतात
झाडा॑चीही परिक्शा असते झाड्सुध्दा पेपर देतात

ऊन पाऊस वादल वारा अवघड अवघड विषय असतात
झाडा॑नाही ताण येतो झाड॑ सुध्दा क॑टाळतात

अशा वेळी झाड॑ मग पाखरा॑च॑ गाण॑ एकतात
जगत राहण॑ यालाच झाड॑ मिरीट्मधे येण॑ म्हणतात

वादळ कितीही मोठ॑ असो झाड॑ जागा सोडत नाही
उन्मळुन पडतात पण आत्महत्या करत नाही।
- वैभव देशमुख

Sunday, March 21, 2010

या माझ्या अडाणी पनाच्या काचा

या माझ्या अडाणी पनाच्या काचा

पसरल्या आहेत माझ्या रस्त्यावर

निसटुन गेल्यासारखा वाटतो त्यांना उचलून फेकन्याचा काळ

ही कवितेची वही घेवुन

या कालाच्या वेगाशी वेग julavataanaa

मी रोजच होतो raktbambaal...

थोडासा हिरवा रंग ..

मी उपटून फेकली असती कविता
पण तिच्यासोबत जगनच उपटून येण्याची
जास्त आहे शक्यता ...

तिने घट्ट धरून ठेवालिये माझ्या जगण्याची माती
कवितेमुले तर लहरतोय थोडासा हिरवा रंग
नाही तर अशा उन्हाळ्यात कोण असतं कोणाचं
मी झाडान्नाही सावल्या चोरातान्ना पहिले ....

Saturday, March 20, 2010

kon mala bal purvat aahe

kon mala bal purvat aahe
mi khadakatun ugavat aahe

tuzech gharte galake nahi
tajmahalahi thibakat aahe...